सातारा -साताऱ्यातील गुंड मनोज बक्कु मिठापुरे (वय ३९, रा. आझादनगर, मोळाचा ओढा, सातारा) यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्याखाली (MPDA) एक वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. सातारा जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
कोविड राडाप्रकरण अंगलट
मिठापुरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्ञाचा वापर, शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धक्काबुक्की करणे, अनाधिकाराने प्रवेश करून मारहाण करणे, अवैध मटका व्यवसाय असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर एकास बेदम मारहाण झाली होती. या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला. हे जम्बो कोविड राडाप्रकरण त्याच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे.
सलग तिसरी कारवाई
शाहुपुरीचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलीस निरीक्षक अमितकुमार बन्सल यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना 'एमपीडी'अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला. 'एमपीडी'अंतर्गत जिल्हाधिकारी यांची ही सलग तिसरी कारवाई आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून यापूर्वी 2017मध्ये या संशयितावर 1 वर्षे तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.