सातारा : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ पालकमंत्री शंभूराज देसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
सोशल मीडियाद्वारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले आहे की माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लवकर बरे होण्याकरिता गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. तसेच माझी तब्येत ठीक आहे. जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, मागील तीन-चार दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कोविड चाचणी करून घ्यावी.
पालकमंत्र्यांचा यात्रेत सहभाग -पाटण तालुक्यातील मरळी हे पालकमंत्री शंभूराजेचे मूळ गाव असून ग्रामदैवताची यात्रेत ते सहभागी झाले होते. यात्रेच्या छबिन्यात त्यांनी ग्रामस्थांसोबत गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी अनेक लोक पालकमंत्र्यांच्या संपर्कात आले. आता पालकमंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मरळी ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
काळजी घेण्याचे आवाहन- नागरिकांनी काळजी घ्यावी सध्या देशभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक व्हायरसमुळे नागरिक आणि लहान मुले आजारी आहेत. कोविड विषाणूचाही प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. देशभरात कोरोना बाधित रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक हादरले आहेत.
राज्यात तब्बल 450 कोरोना रुग्णांची नोंदमंगळवारच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 450 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत जाऊन एकूण 135 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे इन्फ्लूएन्झाच्या एच 3 एन 2 चे 5 मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना पसरत असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथील प्रत्येकी एक अशा एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 316 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.