सातारा - जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव तालुक्यात महावितरण कंपनीच्या डीपी फोडून तांबे चोरणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. संबंधितांकडून 14 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व संशयित तरुण -
सचिन जयसिंग फाळके (40), सुनील माणिकराव शिरतोडे (21), गणेश बाजीराव शिरतोडे (34), विक्रम राजाराम माने (35), ऋषीकेश विलास बनसोडे (21), धीरज अनिल सावंत (21) (सर्व रा. पाडळी, सातारारोड, ता. कोरेगाव) आणि सोमनाथ नयनसिंग सावंत (35, शिवनगर कोडोली सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. या ७ जणांच्या टोळीकडून तब्बल 20 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
डीपी फोडून तांबे चोरणारी टोळी जेरबंद ; 14 लाखांचा मुद्देमाल जप्त तपासासाठी विशेष पथक -
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सातारा व कोरेगाव तालुक्यात ‘महावितरण’ची डीपी फोडून त्यातील तांबे चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी विशेष पथक नेमले होते. 9 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता व 10 डिसेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान अंबवडे सं. (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीतील कॅनॉलजवळील डीपी तोडून त्यामधील, ऑईल सांडून 70 हजार रुपये किंमतीची 70 किलो वजनाची तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत कोरेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
असे पोहोचले संशयितांपर्यंत -
या गुन्ह्यातील संशयितांबाबत माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने सातारा रोड परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कस्टडी रिमांडदरम्यान यातील संशयितांनी सातारा तसेच कोरेगाव तालुक्यातील डीपी चोरीच्या तब्बल 20 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 13 लाखांचे एकूण 1300 किलो वजनाचे तांबे जप्त करण्यात आलेले आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 1 सॅन्ट्रो कार, 2 मोटारसायकल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे असा एकूण 14 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे आहेत शिलेदार -
संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, अंमलदार उत्तम दबडे, ज्योतिराम बर्गे, प्रवीण शिंदे, अतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष, शरद बेबले, नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, रवी वाघमारे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, नीलेश काटकर, राजू ननावरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, केतन शिंदे, चालक संजय जाधव, गणेश कचरे यांनी यशस्वी केली.