कराड (सातारा) - कोळे-अंबवडे (ता. कराड) गावांच्या दरम्यान असलेल्या वांग नदीवरील बंधार्याच्या पुलावरील खडीवरून घसरल्याने दुचाकी नदीपात्रात पडून आजी व नातवाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नदीवरील बंधार्याचे काम करणार्या ठेकेदारावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येरवळे (ता. कराड) येथील शरद यादव हे आई मालन, मुलगी तनुजा आणि मुलगा पियुष यांच्यासह शनिवारी सायंकाळी अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. रात्री सात वाजण्याच्या सुमारास वांग नदीवरील जुन्या बंधार्याच्या पुलावरून येत असताना पुलावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने सर्वजण वांग नदीपात्रात पडले होती. त्यात आजी आणि नातवाचा मृत्यू झाला होता. ठेकेदाराने बांधकामासाठी आणलेली खडी, ग्रीड व अन्य साहित्य पुलावर ठेवले होते. तसेच नूतनीकरण सुरू असल्याचे सूचना फलक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, स्पीडब्रेकर अथवा बॅरिकेटस् न लावता हलगर्जीपणा केला. त्यामुळे अपघात आणि दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा ठेकेदारावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.