सातारा -जिल्ह्यातील कऱ्हाडमध्ये नदीपात्र ओलांडताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन नातींसह आजोबा पाण्यातून वाहून गेले. त्यांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून आजोबांसह दोन मुलींना वाचविले. मात्र, एक मुलगी पाण्यातून वाहून गेली. पाटण तालुक्यातील मोरेवाडी गावानजीकच्या वांग नदीच्या पात्रात गुरूवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही थरारक घटना घडली. आजोबांसह दोन मुलींना वाचविणार्या जाधववाडी ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु, एका मुलीला वाचवू शकलो नाही, याचे दु:ख असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
साताऱ्यात नदी पात्र ओलांडताना आजोबा आणि तीन नाती वाहून गेले हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी
सणबूर (ता पाटण) येथील शंकर रामचंद्र साठे (वय 73) हे बुधवारी (दि.13) श्रावणी शिवाजी साठे (वय10), क्षितीजा शिवाजी साठे (वय 12) आणि स्वरांजली आनंदा साठे (वय10), तीन नातींसमवेत कुठरे (ता. पाटण) येथील आपल्या मुलीकडे मुक्कामी गेले होते. नातींची परीक्षा असल्याने चौघेही गुरुवारी सकाळी सणबूरला जाण्यासाठी निघाले. मोरेवाडी फाट्यावर आल्यावर जवळच्या मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गाडीतून उतरून ते मोरेवाडीतून चालत वांग नदीकडे गेले. नदीपात्रातून पलिकडे जाण्यासाठी ते पाण्यात उतरले. मराठवाडी धरणातून पाणी सोडल्याने नदीच्या पाण्याला मोठा वेग होता. बांधकाम सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या जवळून चौघेही एकमेकांचे हात पकडून नदीपात्र ओलांडू लागले. नदीच्या पैल तीरावर पोहचत असतानाच पाण्याच्या प्रवाहामुळे ते पाण्यात वाहून गेले.
हेही वाचा... रेल्वे बोर्डाने वाढविले जेवणाचे दर; 'या' आहेत नव्या किमती
मुलींचा आरडाओरडा ऐकून अर्धा किलोमीटर अंतरावरील गणेश प्रकाश जाधव, बाबुराव राजाराम बोबडे, सर्जेराव लक्ष्मण इंगाळे, प्रकाश तुकाराम जाधव आणि रमेश विष्णू जाधव या चौघांनी पाण्यात उड्या मारल्या आणि वाहत चाललेल्या तिघांना पकडून पाण्याबाहेर काढले. मात्र, क्षितीजा ही मुलगी त्यांना सापडली नाही. ज्या ठिकाणी तिघांना ग्रामस्थांनी पकडले. तेथून पुढे जवळच मोठा धबधबा आणि खोल डोह आहे. वाचविलेल्या तिघांना ग्रामस्थांनी नदीकाठावर आणले. नाकातोंडात पाणी गेल्याने आजोबा आणि त्यांच्या दोन नाती भेदरल्या होत्या. ग्रामस्थांनी त्यांना जाधववाडीत नेऊन धीर दिला. श्रावणी व स्वरांजली या दोन्ही मुली सणबूरच्या प्राथमिक शाळेत चौथीत, तर पाण्यात बेपत्ता झालेली क्षितिजा सहावीच्या वर्गात शिकते.
हेही वाचा... मैलाचा दगड : एचडीएफसीने ओलांडला 7 लाख कोटींच्या भांडवली मूल्याचा टप्पा
घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सणबूर गावातील साठे कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकही तेथे पोहोचले. क्षितिजा बेपत्ता असल्याचे ऐकून आजी व भावाने हंबरडा फोडला. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी ढेबेवाडी, मालदनपर्यंत नदीपात्रात क्षितीजाचा शोध घेतला. शुक्रवारीसुध्दा दिवसभर शोध मोहीम सुरू होती. परंतु, मुलीचा अद्यापही शोध लागलेला नाही.