सावित्रीबाईंच्या जयंती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे सातारा Savitribai Phule Jayanti: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी (Savitribai Phule)प्रतिकूल परिस्थितीत समाजसुधारणेचं आणि राज्याला पुरोगामी विचारांवर नेण्यासाठी अलौकिक कार्य केलं. त्यांच्या कार्याची महती देशाला कळावी, म्हणून नायगावमध्ये शासनाच्यावतीनं दहा एकर जागा अधिग्रहित करून भव्य स्मारक उभारले जाईल. त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
फुले दाम्पत्य देशासाठी वरदान : स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली. फुले दाम्पत्य हे देशाला लाभलेलं वरदान आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याने सामाजिक कार्यासाठी ऊर्जा मिळते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. वर्षभर लोकांनी या ठिकाणी येऊन सामाजिक परिवर्तनाची ऊर्जा घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
कर्तृत्ववान स्त्रीयांसाठी सावित्रीबाई प्रेरणास्रोत : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारतीय नौसेनेतील युद्धनौकेचे नेतृत्व मराठी महिला करत आहे. लढाऊ विमाने महिला चालवत आहेत. त्यांच्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मूळ प्रेरणास्त्रोत आहेत. शिक्षणाची ज्योत महिलांच्या हाती देऊन समाजाला नवा प्रकाश देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुलींच्या भत्त्यात वाढ करण्याची गरज: अनिष्ट प्रथांवर प्रहार करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून लढल्याचं सांगत, नायगाव येथील स्मारकासाठी हरी नरकेंनी दिलेल्या योगदानाला अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उजाळा दिला. तसेच शालेय मुलींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ करणं आवश्यक असल्याचं भुजबळांनी सांगितलं. सावित्रीबाईंचा जन्मदिन 'महिला शिक्षण दिन' म्हणून देशात साजरा होण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलंय.
हेही वाचा -
- शरद पवार गटाकडून छगन भुजबळ, रूपाली चाकणकरांचा निषेध; सावित्रीबाईंच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक
- महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर
- देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी