सातारा: सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपण लक्ष घालावे व मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी केली.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विविध विषयांसाठी भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून मराठा समाजातील बांधवांना आरक्षण व सद्य स्थितीत विविध सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी परखड भूमिका नाईक-निंबाळकर यांनी मांडली.
हेही वाचा - मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञासिंहसह सर्व आरोपींना 19 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश
युवकांपुढे आरक्षणावीना अडचणी
मराठा समाजातील युवकांचे बरेच प्रश्न अतिशय जटिल बनले असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना युवकांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षणापासून व उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून मराठा आरक्षण मिळण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.