सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार आहे. याबाबत स्वत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी घोषणा केली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपालांच्या महाबळेश्वर दौऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यपाल रमेश बैस हे आजपासून दि. १७ मे पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक लांबणीवर गेला आहे. सत्तासंघर्षावरील निकालाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर पडल्याचे समजते.
पहिलाच दौरा लांबणीवर:महाराष्ट्राचे राज्यपाल हे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला येतात. राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर रमेश बैस यांचा दि. १० ते १७ मे असा दौरा निश्चित झाला होता. परंतु, राज्यपालांचा पहिला महाबळेश्वर दौरा अचानक लांबणीवर गेला आहे. तर राज्यपाल रमेश बैस हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने प्रशासनाने राज्यपाल दौऱ्याची तयारी केली होती. या दौऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमसुद्धा झाले असते. मात्र, हा दौरा लांबणीवर गेला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.