महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजयकाका काँग्रेसमध्ये जातील, या भीतीनेच भाजपने त्यांना उमेदवारी दिली- गोपीचंद पडळकर - Vanchit Bhahujan aaghadi

संजयकाका पाटीलही काँग्रेसमध्ये जातील, या भीतीपोटीच भाजपने आमदारांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर

By

Published : Apr 3, 2019, 10:50 PM IST

Updated : Apr 4, 2019, 6:20 AM IST

सांगली - नाना पटोलेंप्रमाणेच संजयकाका पाटीलही काँग्रेसमध्ये जातील, या भीतीपोटीच भाजपने आमदारांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते सांगलीतील प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

गोपीचंद पडळकर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडळकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पुष्पराज चौकातून शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी सभेत बोलताना पडळकरांनी भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली. मी निवडणूक लढवणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मला उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले. मात्र, त्या सर्वांना या ठिकाणी जमलेली जनता उत्तर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, अशी आहे. मी तुमचा सालगडी म्हणून ५ वर्ष काम करेन त्यामुळे मला वापरून घ्या, असे स्पष्ट करताना पडळकर म्हणाले, २०१४ मध्ये संजयकाका पाटलांना त्यांच्या घरातील लोकांनी मतदान केले नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी मतदान केले. त्यामुळे यावेळी पाटील यांनी आता मला मतदान करावे, संजयकाका पाटील पैरा फेडतात असे ऐकून आहे, त्यामुळे पाटील यांनी या निवडणुकीतून आपला अर्ज माघारी घ्यावा. तसेच विशाल पाटलांनीही आपली अब्रु वाचवायची असेल तर आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहनही पडळकरांनी केले. संजयकाका पाटलांवर टीका करताना पाटलांना कोण ओळखते असा सवाल करत, ४ महिन्यापर्यंत डॉन असणाऱ्या संजय पाटलांना आता काळे कुत्रेसुद्धा विचारत नाहीत. असा टोलाही पडळकर यांनी लगावला.

पडळकरांनी विशाल पाटलांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांनी स्वतःच्या भावाचे काँग्रेसमधून तिकीट कापले आणि आपल्या भावाकडे पैसे नसल्याचे उघड केले होते, त्यामुळे आपल्या भावाचे प्रकरण उघड करणारे जनतेचा विकास कसा करणार? माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित असणारे हाफ चड्डीतील फोटो विशाल पाटील यांनी व्हायरल केले. पण मला काही फरक पडत नाही, कारण जनता माझ्याबरोबर आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Last Updated : Apr 4, 2019, 6:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details