सातारा - मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणेत किती रोजगार निर्माण केला? युवकांच्या रोजगारासाठी काय प्रयत्न केले? असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केला.
कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ डॉ. सावंत यांनी कॉफी वुईथ युथ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाणांना राजकारणातून हद्दपार करा
गांधी घराण्यावर अवलंबून असणार्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणातून हद्दपार करण्याची हीच वेळ असल्याचे सावंत म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांना पराभव समोर दिसत असल्यामुळे माझी शेवटची निवडणूक आहे. यापुढे मी रिटायर होणार आहे, अशी भावनिक साद ते कराड दक्षिणमधील जनतेला घालत आहेत. जनतेने त्यांना आत्ताच रिटायर करावे आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिलेल्या डॉ. अतुल भोसले यांना विजयी करावे. केंद्राप्रमाणे राज्यातही पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे अतुल भोसले सत्तेत गेल्यास सरकारच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संकल्पना राबवतील. त्यामुळे युवकांनी परिवर्तनाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.