कराड (सातारा) -ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे साताऱ्यातील कराडचे सुपूत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्कार देण्याची मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच त्यांनी याबाबत राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीनेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर येथील दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 मधील हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाइल बॅन्टमवेट कुस्ती प्रकारात 'कांस्य पदक' पटकावत भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. भारत सरकारने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट छापले. तसेच 2000 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'अर्जुन' पुरस्काराने गौरविले होते.