सातारा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाचे दरवाजे आज सकाळी 10 वाजता साडे दहा फूट उघडण्यात आले आहे. या धरणातील पाणीसाठा 88.11 टीएमसी झाला आहे. पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक, तर सहा वक्र दरवाजांमधून 50,536, असा एकूण 52,636 क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उघडले दरवाजे -
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे बरेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरण व्यवस्थापनाने कोयना धरणाचे दरवाजे आज सकाळी साडे दहा फूट उघडले आहेत. धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. धरण व्यवस्थापनाला ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवावी लागते. पावसाचे प्रमाण, धरणातील पाण्याची आवक आणि वाढणारी पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडे दहा फुटांनी उघडण्यात आले आहेत. दरम्यान, पाटणसह कराड तालुक्यातही शुक्रवारी (दि. 30) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे.
हेही वाचा -जम्मू काश्मीर : पुलवामाच्या हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी एन्काउन्टरमध्ये ठार