सातारा- महिलेवर दोनवेळा सामूहिक बलात्कार केलेल्या तुषार मालोजी भोसले (वय 26, रा.गोंदवले ता. माण) याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पथकाने सोमवारी (दि. 23 डिसें.) दुपारी अटक केली. संशयिताने अत्याचाराचा व्हिडीओ असल्याचे सांगून महिलेला ब्लॅकमेल केले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बलात्काराचा प्रकार शिवेंद्र गार्डन, दहिवडी येथे घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित तुषार भोसले याच्यावर बलात्कारासारखे दोन गंभीर गुन्हे तसेच विषारी औषध पाजून जीव घेण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. दि.१२ डिसेंबर रोजी संशयित तुषार भोसले याने त्याच्या दोन साथीदारांसोबत महिलेला व्हिडीओ असल्याचे सांगून बलात्कार केला. यावेळी संशयितांनी त्या महिलेला मारहाण करुन दमदाटी, शिवीगाळ केली. याशिवाय शिवेंद्र गार्डन येथेच दि. २० एप्रिल रोजी तुषार भोसले, भरत सस्ते व शहाजी भोसले यांनी याच तक्रारदार महिलेचा बलात्कार केला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत संशयितांवर बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत.