कराड (सातारा) -काँग्रेसचे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पार्थिवावर काल सोमवारी सायंकाळी उंडाळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली. उंडाळकरांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
विलासकाका उंडाळकरांच्या पार्थिवावर उंडाळे येथे अंत्यसंस्कार विधानसभेत कराड दक्षिणचे ३५ वर्षे नेतृत्व -
विलासकाका गेली सहा दशके सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. राज्याच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा राहिला. सडेतोड स्वभावामुळे राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. सलग सातवेळा हाताच्या चिन्हावर निवडून येऊन विधानसभेत कराड दक्षिणचे ३५ वर्षे त्यांनी नेतृत्व केले. विविध खात्यांचे मंत्रिपदही भूषविले. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया तसेच शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी उंडाळकरांचे घनिष्ठ संबंध राहिले.
सातार्यात उपचार सुरू असताना काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सातारा येथील निवासस्थानी आणि तेथून कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी कराड शहर आणि तालुक्यातील मान्यवरांसह नागरीकांच्या त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. नंतर त्यांचे पार्थिव उंडाळेला नेण्यात आले. पाचवड फाट्यापासून उंडाळ्यापर्यंत गावोगावच्या लोकांनी उंडाळकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
उंडाळे परिसरातील सर्व व्यवहार बंद -
उंडाळे येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आल्यानंतर संपूर्ण उंडाळे गाव आणि पंचक्रोशीतील लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. निवासस्थानासमोर पोलीस दलाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनात उंडाळकरांचे पार्थिव ठेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा सुरू असताना खा. उदयनराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी उंडाळकरांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रेत कराड दक्षिणमधील अबालवृध्द सहभागी झाले होते. उंडाळकरांच्या निधनाची वार्ता समजताच सकाळपासूनच उंडाळे परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
अंत्यसंस्कारावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकार मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी विलासकाका उंडाळकरांच्या राजकारण, समाजकारणातील योगदानाला उजाळा दिला. विलासकाकांनी अखेरपर्यंत पक्षनिष्ठा आणि पुरोगामी विचार जोपासला. त्यांच्यासारखा नेता पुन्हा सातारा जिल्ह्यात होणार नाही, अशा शब्दांत उंडाळकरांना श्रध्दांजली वाहिली.
महिला अन् कार्यकर्त्यांना अश्रू अनावर...
गेली पन्नास वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे विलासकाकांनी कार्यकर्त्यांना जपले. राजकारण, सहकार क्षेत्रात सामान्यांना पदे दिली. त्यामुळे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ कायम होते. काकांच्या निधनामुळे आपला आधारवड हरपल्याचे दु:ख कार्यकर्त्यांना सहन झाले नाही आणि कार्यकर्त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याचप्रमाणे कार्यकर्त्याच्या घरात अगदी चुलीपर्यंत जाणारा एकमेव नेता म्हणून विलासकाकांची ओळख होती. त्यामुळे वयस्कर महिलांनाही आपले अश्रू रोखता आले नाहीत.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचे निधन हा काँग्रेस पक्षासाठी धक्का असून काकांच्या जाण्याने राज्यातील काँग्रेसचे पितृतुल्य छत्र हरपले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासकाकांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. विलासकाका हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. कोणत्याही पक्षांच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेसची विचारधारा त्यांनी जोपासली. विचारधारेशी ते कायम प्रामाणिक राहिले. कधीही ते जातीयवादी विचारधारेकडे झुकले नाहीत. जनतेशी नाळ असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग ३५ वर्षे आणि जवळपास १२ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून विविध खात्यांची त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती, असेही चव्हाण म्हणाले.
विलासकाकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा आदर राखून जातीयवादी, धर्मांधता, धनदांडग्यांच्या विरोधात एकत्र येऊन आपल्या भागातील राजकीय संस्कृती टिकवणे हे त्यांचे अधुरे कार्य आपण हाती घ्यायला हवे. विलासकाका महाराष्ट्रभर त्यांची पक्षनिष्ठा व कर्तृत्वसिद्ध नेते म्हणून प्रसिद्ध होते. तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा कैवार जपत त्यांच्या हाल अपेष्ठा त्यांनी दूर केल्या. मुत्सद्दी व तात्विक राजकारणी आज अनंतात विलीन झाला असल्याचे भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले.
हेही वाचा - श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण