कराड (सातारा) -'लागीर झालं जी' मालिकेतील 'जिजी' अर्थात कमल ठोके यांच्या पार्थिवावर कराडच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कमल ठोके यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या बंगलुरू येथील मुलाकडे राहत होत्या. रविवारी पहाटे त्यांचे पार्थिव कराड येथील मंगळवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्याता आले होते. 'जिजीं'च्या रूपाने आमच्या कुटुंबातील सदस्य हरपला असल्याची भावना यावेळी सहकलाकारांनी व्यक्त केली.
'लागीर झालं जी' मालिकेतील 'जिजी' कमल ठोके यांच्या पार्थिवावर कराडमध्ये अंत्यसंस्कार - satara kamal thoke news
कमल ठोके यांच्या पार्थिवावर कराडच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
'जिजी' ही माझी आजीच होती. ती मला नातू म्हणायची. मालिकेतील आम्ही सर्व कलाकार कुटुंबासारखेच होतो. 'जिजी'च्या निधनाने आमच्या कुटुंबातील सदस्य हरपलाय, अशा शब्दांत 'लागीर झालं जी' मालिकेत 'जिजी'च्या नातवाची आणि मुख्य नायकाची भूमिका साकारलेल्या अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण याने आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्हाला 'जिजी'ची कायम आठवण येत राहिल. तिची जागा कुणीच भरून काढू शकणार नाही, असेही तो म्हणाला.
लॉकडाऊननंतर भेटू म्हणाली, पण...-
'जिजी'ने प्रत्येक गोष्टीत आम्हाला आधार दिला. कुटुंबातील लोकांप्रमाणे ती आमच्या पाठीशी राहिली. लॉकडाऊनच्या काळात फोनवरून आमचे बोलणे झाले होते. लॉकडाऊननंतर भेटू म्हणाली होती, पण अशा अवस्थेत गाठ पडली, असे सांगताना मालिकेत जिजीच्या भावाची भूमिका साकारलेले संतोष पाटील भावूक झाले.
वयाने मोठी, तरीही तीच सर्वात तरूण होती-
मालिकेतील सर्व कलाकारांध्ये जिजी वयाने मोठी होती. परंतु, तिचा उत्साह पाहता तीच सर्वात तरुण वाटत होती, असे राव्हल्याची भूमिका केलेल्या राहुल मगदूम याने सांगितले. मी आयुष्य आनंदात जगले. मालिकेमुळे घराघरात पोहोचले, असे जिजी म्हणायची. तिचे मार्गदर्शन आणि प्रेम आम्हाला मिळाले, असेही तो म्हणाला.
चित्रपट महामंडळाच्यावतीने वाहिली श्रद्धांजली-
महेश देशपांडे यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने कमल ठोके यांना श्रद्धांजली वाहिली. 'लागीर झालं जी' मालिकेमुळे त्यांचे सर्वत्र नाव झाले. खूप कलाकारांना त्यांचे मार्गदर्शन मिळत होते, असे देशपांडे म्हणाले.
हेही वाचा- सोलापूर संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन; खड्ड्यामध्ये आकाशदिवा लावून केली दिवाळी साजरी