सातारा- कराड नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेनंतर गेल्या आठ दिवसांपासून फेरीवाले आणि फळ विक्रेत्यांचा व्यवसाय बंद आहे. पालिकेने या व्यवसायिकांबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात फेरीवाले आणि फळ विक्रेत्या महिलांनी आज जागतिक महिला दिनी भीक मांगो आंदोलन केले आहे. महिलांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याही निवासस्थानी जाऊन भीक मागितली. त्यामुळे, भीक मांगो आंदोलनाबाबत कराडमध्ये मोठी चर्चा रंगली झाली.
कराडमध्ये मागील आठवड्यात अतिक्रमणविरोधात धडक मोहिम राबविण्यात आली होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तात शहरातील सुमारे २ हजार अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा मारला होता. या कारवाईमुळे कराडात प्रलयकारी भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सार्वजनिक रस्त्यावर आणि गटारांवर व्यवसायिक तसेच रहिवाशांनी केलेली अतिक्रमणे जेसीबीने काढून टाकले. तसेच फेरीवाले आणि रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणार्या फळ विक्रेत्यांनाही हटविण्यात आले. परिणामी, फेरीवाले आणि फळ विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.