सातारा - शहरात प्रजासत्ताक दिनापासून चार ठिकाणी १० रुपयात 'शिवभोजन थाळी' उपलब्ध होणार आहे. सातारा एसटी कॅन्टीन येथे १५० थाळी, जिल्हा परिषद कार्यालय भोजनालय येथे १५०, बेंद्रे स्नॅक्स, मोती चौक येथे १०० आणि क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १०० याप्रमाणे दररोज ५०० थाळी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी या बाबत माहिती दिली.
थाळी मिळण्याची वेळ दुपारी १२ ते २ -
एसटी स्टँडवरील कॅन्टीनमध्ये शिवभोजन केंद्राचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात आणि एक वाटी वरणाचा समावेश असेल. ही थाळी दहा रुपयांत मिळणार आहे. भोजनालयाची वेळ दुपारी १२ ते २ असून या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई असेल. एका लाभार्थ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त थाळी मिळणार नाही.