सातारा- नफेखोरी, काटामारी या व अशा अनेक प्रकरणात जिल्ह्यातील 3 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एका दुकानदाराला निलंबित करण्यात आले आहे. तर, इतर दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 17 दुकानांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साताऱ्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
देवकाते यांनी सांगितले, की कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमी लाभार्थ्यांना रेशन धान्य देण्यात येत आहे. यादरम्यान येत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके तक्रारी असलेल्या दुकानांना तसेच इतर संवेदनशील दुकानांना भेटी देवून तपासणी करत आहेत. तसेच तक्रारींचे निराकरण करत आहेत.
सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुक्यांमध्ये 1 हजार 681 स्वस्त धान्य दुकाने आहेत. गेल्या 5 दिवसात 190 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यात 17 दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये जास्त दराने धान्य विकणे, विहित परिमाणापेक्षा कमी धान्य देणे या कारणास्तव 3 स्वस्त धान्य दुकाने रद्द करण्यात आली आहेत. तर, 1 दुकान निलंबित करण्यात आले आहे. तसेच 2 तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.