सातारा - मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीला ( Koyana river flood ) आलेल्या पुराने चतुरबेट साकव पूल पाण्याखाली गेल्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ( Heavy rain in Mahabaleshwar ) दहा आणि वाई तालुक्यातील दोन, अशा बारा गावातील 233 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील 203 कुटुंबांचे ( 203 families displaced in Mahabaleshwar ) स्थलांतर- मागील वर्षी अतिवृष्टीत चतुरबेट पूल वाहून गेला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने सिमेंटच्या पाईप टाकून तापूरता पूल तयार केला होता. मात्र, सध्याच्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात तोही पूल वाहून गेला आहे. चतुरबेट परिसराच्या दळणवळणासाठी तयार केलेला लोखंडी साकव पुल देखील पाण्याखाली गेल्यामुळे चार गावांचा पुर्णत: संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर आणि वाई तालुक्यात सध्या तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील दरे, दुधोशी, घावरी, येर्णे बुद्रुक, येर्णे खुर्द, मालूसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली या दहा गावातील 203 कुटुंबांतील 940 व्यक्तींचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, मंदिरे, खासगी बंगले व हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
वाई तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात प्रांताधिकार्यांची भेट-वाई तालुक्यातील जोर डुईचीचीवाडी येथील 30 कुटुंबातील 164 ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर व एका घरामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी कांदाटी खोरे आणि तापोळा परिसरातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणींची तातडीने सोडवणूक करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील उपस्थित होत्या.
संततधार पावसामुळे रस्ता खचला -दोन दिवसांपूर्वीखुडपुलेवाडी येथे भुस्खलन होऊन रस्ता खचल्यामुळे प्रांताधिकारी सुनिल गाडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी गाडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन काळजी घेण्याच्या सूचना केल्या. गावातील ४ ते ५ कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलांची कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.