सातारा :सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा ही मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक कावडीसह दाखल होतात. रविवारी यात्रेसाठी भाविक डोंगर चढून मुंगी घाटातून वर येत होते. त्यावेळी चौघेजण कावडीसोबत घाटातून खाली कोसळले. यावेळी उपस्थित असणार्या सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी त्यांना तातडीने घाटातून वर काढून रूग्णालयात दाखल केले. पाडव्याच्या मुहुर्तावर हळदीच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरूवात झाली आहे.
महादेवाच्या पिंडीला अभिषेक :चैत्र शुध्द पंचमीस श्रींचा विवाह सोहळा असतो. त्यासाठी मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर आणल्या जातात. सासवड येथील मानाची तेल्याभुत्याची कावड ही रात्री उशीरा गडावर पोहचते. त्या कावडीतील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. राज्यभरातील भाविक कावड घेऊन गडावर चढतात. गडावर पोहचल्यानंतर त्यातील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो.
आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भाविकांची उपस्थिती :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेव यात्रेला गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने सुरूवात झाली आहे. सातार्यापासून पूर्वेकडे 90 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव देवस्थान आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला हजेरी लावतात. शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा हा यात्रेतील मुख्य उत्सव असतो.