सातारा - प्रो कबड्डीमुळे मैदानावरील निदान रेषा सर्वपरिचित झाली. सामन्याची गतिमानता या रेषेमुळे वाढली. साखळी करून घेरू पाहणाऱ्याच्या खांद्यावरून मारलेली हनुमान उडी पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. कबड्डी क्षेत्राला ही देणगी डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून मिळाली आहे. होय, डाॅ. नरेंद्र अच्युत दाभोलकर! डाॅ. दाभोलकर हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते, याशिवाय ते आट्यापाट्या व खोखो हे खेळही चांगले खेळायचे. हे साताऱ्याबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे. सात शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू देणाऱ्या साताऱ्याच्या शिवाजी उदय मंडळाचे ते खेळाडू. या सातपैकी उत्कृष्ट खेळाडू व उत्तम संघटक, असे दोन पुरस्कार डाॅक्टरांच्या नावावर आहेत.
नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन मंडळाचे सर्वेसर्वा गुरुवर्य बबन उथळे, डाॅक्टरांचे एकेकाळचे सहकारी खेळाडू राहिलेले छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते विजय जाधव, राष्ट्रीय खेळाडू, माजी प्राचार्य उत्तमराव माने यांनी डाॅक्टरांच्या क्रीडा क्षेत्रातील स्मृतींना उजाळा दिला. गुरुवर्य बबन उथळे म्हणाले, इयत्ता ५ वीत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना नरेंद्र दाभोलकर मंडळात आले. महाराष्ट्राचा उत्कृष्ट कबड्डीपटू, शिवाजी विद्यापीठाचा संघनायक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू असा दिघंत त्यांनी अंगभूत कौशल्यावर निर्माण केला. महाराष्ट्रात दाभोलकर यांच्यासारखी हनुमान उडी कोणी मारली नाही. मुंबईची सद्दी मोडून राज्याचे संघनायक झालेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कबड्डीपटू, छत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव आपल्या जडणघडणीचे श्रेय दाभोलकरांना देतात. ते म्हणाले, नरुभाऊंच्या आग्रहामुळे मला निवड चाचणीत संधी मिळाली. विजू तू कोणताही दबाव न घेता तुझा नैसर्गिक खेळ दाखव, असे त्यावेळी ते म्हणाले होते. त्यानंतर कबड्डीत मी कधीच मागे वळून पाहिले नाही, असेही जाधवांनी सांगितले.
हेही वाचा -'पूर परिस्थितीमुळे नुकसान होण्यापेक्षा दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी देण्याची आमची भूमिका'
त्यांच्या खेळाविषयी आठवणी सांगताना जाधव म्हणाले, त्यांचे पदलालित्य सुंदर होते. चढाई केल्यानंतर पायाला इतका जोरदार हिस्डा मारायचे की पकड करणाऱ्या विरोधी खेळाडूच्या हाताला झिंझिण्या यायच्या. घेरून पकडायला आलेल्या खेळाडूच्या खांद्यावरून लिलया उडी घेऊन ते मध्यरेषेकडे निसटायचे. ही उडी पुढे कबड्डी क्षेत्रात 'हनुमान उडी' म्हणून उदयास आली. या कौशल्याचे जनक म्हणून श्रेय नरुभाऊंकडे जाते.
नरेंद्र दाभोलकर कबड्डी खेळताना उत्तमराव माने म्हणाले, वैद्यकीय सेवेतून वेळात वेळ काढून ते मंडळाच्या मैदानावर खेळायला येत. जात, धर्म, पंथापलिकडे एक खेळाडूची भावना आम्हाला या मैदानावर मिळाली. आम्ही हातात हात घालून या मातीशी मस्ती केली. युद्धामध्ये जशी रणनिती असते, तशी रणनिती कोणत्याही सामन्याआधीच्या रात्री ठरली जायची. समोरच्या संघातील बारकाव्याने उणिवा, बलस्थाने शोधून कोणत्या खेळाडूला कशा प्रकारे सामोरे जायचे, कोणी कशी चढाई, बचाव करायचा याची रणनिती ते स्वत: आखत आणि सहकाऱ्यांना सूचना देत.
हेही वाचा -'सह्याद्रीच्या माथ्यावरील तलावाची अपूर्ण कामे पूर्ण केली तर पूरपरिस्थिती आटोक्यात येईल'
समोरच्या संघावर मात करण्यासाठी आपल्याला काय-काय व्ह्यूरचना केली पाहिजे, याचा त्यांचा दांडगा अभ्यास असायचा. तंत्रशुद्ध कबड्डीचा जन्म दाभोलकरांच्या माध्यमातून झाला. आक्रमक खेळामध्ये भारतात दाभोलकरांची चढाई ही सर्वोत्कृष्ट चढाई समजली जायची, असेही माने यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नाव घेतलं की, केवळ राज्यातच नव्हे देशभरात एकच नाव आजही समोर येत ते म्हणजे डाॅ. नरेंद्र दाभोलकर! या समितीचे कार्याध्यक्ष, कृतीशिल विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, साधना साप्ताहिकाचे संपादक, पत्रकार, जटा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एक गाव एक पाणवठा चळवळ, सत्यशोधक व विवेकी विचारांचे प्रसारक, सामाजिक कृत्यज्ञता निधी, अशा एकनाअनेक संस्था व कार्याशी डाॅ. दाभोलकर यांचे नाव जोडले गेले. याशिवाय आणखी एक क्षेत्र आहे ज्या विषयी लिहायचे झाले तर डाॅ. दाभोलकर यांचे नाव घेतल्या शिवाय इतिहासाचे पान पुढे जाऊ शकत नाही; ते म्हणजे 'कबड्डी'!
नरेंद्र दाभोलकर कबड्डी खेळताना