सातारा - विधवा प्रथा बंदीचा केवळ ठराव घेऊन न थांबता ग्रामसभेतच विधवा महिलांना हळदी कुंकू लावून तसेच हिरवा चुडा भरून ठरावाची प्रत्यक्ष कार्यवाही माण तालुक्यातील किरकसाल गावाने केली आहे. तसेच आपल्या मुलीच्या लग्नात हळदीचा पहिला मान विधवा महिलांना देणार असल्याची शपथ माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर यांनी ग्रामसभेत घेतली.
ग्रामसभेत ठराव, तातडीने कार्यवाही -किरकसाल ग्रामपंचायतीने सरपंच शोभा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी डी. बी. भोसले, माजी सरपंच अमोल काटकर, पोलीस पाटील दत्तात्रय रसाळ, उमेद अभियानाच्या समन्वयक दीपाली मासाळ, कृषी सहाय्यक प्राची निकाळजे, सुनील काटकर, निवृत्ती काटकर, ग्रामसेवक विकास गायकवाड उपस्थित होते. अमोल काटकर यांनी विधवा प्रथाबंदीचा ठराव मांडला. उपस्थितांनी त्याला एकमताने संमती दिली. तसेच सरपंच शोभा कुंभार यांनी विधवा महिलांना हळदी-कुंकू लावत हिरव्या बांगड्या भरल्या. पती निधनानंतर पहिल्यांदाच कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेताना महिला भावूक झाल्या होत्या. भावनिक वातावरणाने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.