सातारा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे आज सकाळी निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विलासकाका उंडाळकरांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन गेली पाच दशके उंडाळकर यांनी सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात कार्य केले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान १२ वर्षे त्यांनी विविध खात्यांची मंत्रीपदेही भूषविली होती. पुरोगामी आणि काँग्रेसचे निष्ठावंत मंत्री म्हणून त्यांची ओळख होती.
कोण होते विलासकाका उंडाळकर?
15 जुलै 1938 उंडाळकरांचा जन्म झाला होता. विलासराव बाळकृष्ण पाटील हे त्यांचे पूर्ण नाव होते. मात्र, त्यांच्या गावाच्या नावामुळे त्यांना उंडाळकर या नावावेच ओळखले जाई. त्यांनी कायद्याची पदवी मिळवलेली होती. विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना सहकार खाते, दुग्धविकास व पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्यांचे मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली होती. सलग 35 वर्षे ते कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चव्हाण विजयी कराड दक्षिणचे आमदार झाले होते.
विलासकाका उंडाळकर यांची कारकिर्द -
- जिल्हा परिषद सदस्य : 1967 ते 1972
- शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1967 ते आजअखेर संचालक.
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष.
- सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, फ्रान्स, थायलंड दौरा.
- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून 1980 पासून 2014 पर्यंत नेतृत्व.
- 1991 ते 1993 : दुग्ध विकास, पशुसंवर्धन मंत्री
- 1999 ते 2003 : विधी, न्याय व पुनर्वसन मंत्री
- 2003 ते 2004 : सहकार मंत्री
- चीन अभ्यास दौरा : 2008
विलासकाका उंडाळकर यांनी स्थापन केलेल्या संस्था : - 1971 मध्ये ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना.
- 1981 मध्ये स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेची स्थापना.
- 1996 मध्ये कोयना सहकारी बँकेची स्थापना.
- 1996 मध्ये रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना.
- रयत बायोशुगर, रयत वस्त्रोद्योग संकुल.
त्यांनी राबवलेले महत्त्वकांक्षी उपक्रम : - 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन, समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.
- महाराष्ट्र शासनाच्या डोंगरी विकास निधीचे शिल्पकार.
- 20 कलमी मुलभूत सुविधांचा कार्यक्रम राबविणारे देशातील अग्रणी आमदार.
- वाकुर्डे-बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देशातील पहिला नदीजोड प्रकल्प निर्माण करणारे भागीरथ.
- जलसिंचनाच्या माध्यमातून डोंगरी भागातील 51 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून सिंचनाचा पॅटर्न निर्माण करणारे जलदूत.
विलासकाकांनी लढवलेल्या निवडणुका : - 1967 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकतर्फी विजय
- जिल्हा बँक निवडणुकीत 1968 पासून एकतर्फी विजयी/बिनविरोध
- 1979 च्या लोकसभा निवडणुकीत कराड, पाटण तालुक्यातून 72 हजार मतांची आघाडी
- 1980 ते 1985 ची विधानसभा निवडणूक : 21 हजार मतांनी विजयी
- 1985 ते 1990 ची विधानसभा निवडणूक : 12 हजार मतांनी विजयी
- 1990 ते 1995 ची विधानसभा निवडणूक : 21 हजार मतांनी विजयी
- 1999 ते 2004 ची विधानसभा निवडणूक : 23 हजार मतांनी विजयी
- 2004 ते 2009 ची विधानसभा निवडणूक : 1 लाख मतांनी विजयी (राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी)
- 2009 ते 2014 ची (मतदार संघ पुनर्रचनेनंतरची) विधानसभा निवडणूक : 18 हजार मतांनी विजयी