महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता वाघिणच नाही राहिली तर जंगल राखून करायचं काय! वनक्षेत्रपाल दीपालीच्या आईची खंत - deepali-chavan mother expressed grief

वर्‍हाडातील लोकप्रतिनिधींना भेटून दीपालीने आपल्याला वरिष्ठांकडून होत असलेला त्रास सांगितला होता. विशेषत: खासदार नवनीत राणा यांना या सार्‍या प्रकाराची कल्पना दीपालीने दिली होती. मात्र, कोणी त्यांचा अखेरपर्यंत पाठपुरावा केला नाही. आता सगळे म्हणतात तिने आम्हाला नाही सांगितले

Forest Ranger Deepali's mother expressed grief about not taking action against the responsible officer
आता वाघिणच नाही राहिली तर जंगल राखून करायचं काय! वनक्षेत्रपाल दीपालीच्या आईची खंत

By

Published : Mar 31, 2021, 12:38 PM IST

Updated : Apr 1, 2021, 7:46 PM IST

सातारा - दीपालीने जंगल राखले, ती वाघिण होती. आता वाघिणीच राहिली नाही तर ते जंगल राखून काय कारायचे? अशा शब्दात सद्गदित भावना दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या आई श्रीमती शकुंतला चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या. जबाबदार अधिकाऱ्याला तुमच्याकडून फाशीची शिक्षा देणे जमत नसेल तर त्याला माझ्यासमोर उभा करा, मी देते त्याला फाशी. मग माझ्यावर कारवाई झाली तरी बेहत्तर. तिने अनेकांकडे होणारा त्रास व्यक्त केला होता. त्याच वेळी कारवाई झाली असती तर आज माझा पोटचा गोळा माझ्या पुढे असता. अशी खंतही श्रीमती चव्हाण यांनी व्यक्त केली.

आता वाघिणच नाही राहिली तर जंगल राखून करायचं काय! वनक्षेत्रपाल दीपालीच्या आईची खंत

काय आहे प्रकरण
हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, पती राजेश मोहिते आणि आई शांताबाई चव्हाण यांच्या नावे तीन स्वतंत्र पत्र लिहिले होते. या तिन्ही पत्रात उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या जाचामुळे आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पत्रात अपर प्रधान मुख वन संरक्षक रेड्डी यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून ते तक्रारीची दाखल घेत नव्हते. त्यांचा हात शिवकुमारच्या डोक्यावर आहे असेही दीपाली चव्हाण ने लिहिले आहे. दीपालीच्या आत्महत्येनंतर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर श्रीमती चव्हाण मंगळवारी रात्री साताऱ्यात परतल्या. प्रदेश काँग्रेसच्या सदस्या रजनीताई पवार यांच्या निवासस्थानी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी श्रीमती चव्हाण यांनी आपल्या भावना मांडल्या.

कोणीही मदतीला नाही आले
वर्‍हाडातील लोकप्रतिनिधींना भेटून दीपालीने आपल्याला वरिष्ठांकडून होत असलेला त्रास सांगितला होता. विशेषत: खासदार नवनीत राणा यांना या सार्‍या प्रकाराची कल्पना दीपालीने दिली होती. मात्र, कोणी त्यांचा अखेरपर्यंत पाठपुरावा केला नाही. आता सगळे म्हणतात तिने आम्हाला नाही सांगितले! मेल्यावर सगळे असेच म्हणतात, जिवंतपणी तिने एवढ्या लोकांना सांगितले पण कोणीही मदतीला आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कोणी देणार मुलगी परत!
माझ्या मुलीला कोणाचं पाठबळ नव्हतं. ती गरिबीतून शिकली. निवड झाल्यानंतर तिला थेट मेळघाटला पाठवलं. तिथे फोन नाही साधा, तरी तिने अडचणीच्या परिस्थितीत नोकरी केली. माझ्या थोरल्या मुलीला बहीण नाही, नातवंडांना मामा- मावशी नाही राहिले. कोणी देणारे का माझी मुलगी परत! अशा शब्दात श्रीमती चव्हाण यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी दीपालीला सेवेत असताना वरिष्ठांकडून झालेल्या त्रासाचा पाढा वाचला. तिच्यावर सेवा काळात चुकीचे आरोप लावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा पुनरुच्चारही श्रीमती चव्हाण त्यांनी केला.

हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणूक: शैलजा गोडसेंची बंडखोरी, शिवसेनेतून हकालपट्टी

Last Updated : Apr 1, 2021, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details