कराड(सातारा) - पर्यटनासाठी भारतात आलेल्या एका परदेशी तरूणीच्या कारनाम्यामुळे काल (रविवारी) कराड-पाटण मार्गावर सिनेस्टाईल थरार पहायला मिळाला. पाटण तालुक्यातील निसरे येथे उभी असलेली जीप सुरू करून तरूणी भरधाव कराडकडे येत होती. कराडजवळ आल्यानंतर जीपने वॅगनर कारला पाठीमागून धडक दिली आणि जीप पलटी झाली. सुमारे 18 कि. मी. अंतरादरम्यानचा हा सिनेस्टाईल थरार अखेर अपघातानंतर थांबला. पावलिना कोरोनालिया जेसीजे (नेदरलँड), असे परदेशी तरूणीचे नाव असून तिच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे.
नागरिक आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परदेशी तरूणीने म्हावशी (ता. पाटण) येथील सुस्वाद हॉटेलमध्ये जेवण केले. तेथील चारचाकी गाडी घेऊन पसार होण्याचा तिने प्रयत्न केला. परंतु, गाडीचा मालक हॉटेलमध्ये असल्याने तो बेत फसला. नंतर ती निसरे येथे आली. त्या ठिकाणी एक जीप (क्र. एम. एच. 13 एन. 549) उभी होती. किल्लीही गाडीच्या स्वीचला होती. ती तरूणी थेट गाडीत बसली आणि गाडी स्टार्ट करून ती कराड बाजूकडे भरधाव आली. रस्त्यात अनेक वाहनांना तिने हुलकावण्या दिल्या. सुमारे 18 कि. मी. अंतरादरम्यानचा हा थरार अखेर कराडजवळच्या मुंढे गावच्या हद्दीत जीपला झालेल्या अपघातामुळे थांबला.