सातारा -कोयना धरण परिसरात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फूटावरून आठ फूटावर करण्यात आले.
कोयना परिसरात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे
धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. धरणाच्या पाणीसाठ्यातही अपेक्षित घट झाल्याने कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी केला आहे. सध्या धरणातून 68,304 आणि वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
हेही वाचा - कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील मैदानात; सतेज पाटलांनी केली घोषणा
याचवेळी धरणात प्रतिसेकंद सरासरी पन्नास ते साठ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, पूर्वेकडील विभागात महापूराची स्थिती अद्यापही कायम आहे. धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना नदीवरील नेरळे, मूळगाव, निसरे येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावातील खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व महापूराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली.