सातारा : जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील दोघे तर सातारा, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे
'आत्महत्यांचे कारण अद्याप अस्पष्ट' -
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथील अपवाद वगळता एकाही आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भिलार, आसगाव, नारायणवाडी, वारुंजी व चिंधवली येथे गळफास घेऊन झालेल्या आत्महत्यांमध्ये तीन युवकांचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील आसगाव येथील सागर साहेबराव येवले (वय 31) याने राहत्या घरी, किचनमध्ये तंगूसाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती विद्यानगर येथील रहिवासी अक्षय साहेबराव येवले (वय 28) याने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. सागरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मानसिक आजाराला कंटाळून गळफास
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे रमेश किसन भिलारे (वय 56) यांनी मानसिक आजाराला कंटाळून गळफास घेतला. रमेश यांनी वनविभागाच्या भिलारसडा या जागेत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर विजय किसन भिलारे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात दिली. वाई तालुक्यातील चिंधवली येथील महादेव संजय पवार (वय 27) या युवकाने कृष्णा नदीपात्रातील झाडाला साडीच्या काठाने विणलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास संजय पवार (वय 30) यांनी याबाबतची माहिती भुईंज पोलिसांना दिली आहे.
कराड तालुक्यात दोन प्रकार
कराड तालुक्यातील वारुंजी येथील श्रीकृष्ण जयसिंग पाटील (वय 38) यांनी जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती डॉ. मल्हारी दगडू यांनी कराड शहर पोलिसांना दिली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत. नारायणवाडी (ता. कराड) येथील प्रकाश तानाजी खुडे (वय 50) यांनी घराच्या तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. संभाजी खुडे (वय 60, रा. नारायणवाडी) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली आहे.