सातारा- गेल्या तीन महिन्यांपासून पाटण तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून येत होते. शनिवारी पाटण शहरात प्रथमच कोरोनाबाधित सापडला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चव्हाण गल्लीत एक जण कोरोनाबाधित सापडल्याने शहरात मोठी खळबळ माजली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून चव्हाण गल्लीचा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
पाटण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारपर्यंत तालुक्यात रुग्णांची संख्या 171 इतकी झाली आहे. शहरात नगरपंचायतीकडून सातत्याने कोरोनाबाबत जनजागृती करून नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जात होते. काही वेळेस नागरिकांना दंडही करण्यात आला. शहरात नव्याने दाखल होणाऱ्यांना तात्काळ क्वारंटाइन केले जात होते. त्यामुळे शहरात कोरोनाने प्रवेश केला नव्हता.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चव्हाण गल्लीतील एकजण हा सातारा जिल्हा परिषदेत कामास असून तो दररोज एसटीतून प्रवास करत होता. चार पाच दिवसांपूर्वी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधिताच्या नातेवाईक आणि संपर्कातील व्यक्तींनाही पाटण येथे हाय रिस्कमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.