सातारा - खासगी वृत्त वाहिनीवरील एका कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उदयनराजे-संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य ; अॅड. सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी राजेंद्र बापुराव निकम (तारळे ता. पाटण) यांनी तक्रार दाखल केली. राजेंद्र निकम हे स्वराज्य सेना (महाराष्ट्र) या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. तक्रारीत त्यांनी असे म्हटले की, एका मराठी वृत्तवाहिनीवर आरक्षण संदर्भात कार्यक्रम सुरू होता. त्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीची टिका केली. तसेच मी छत्रपतींच्या गाद्यांना मानत नाही, असे बोलून मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा एकेरी उल्लेख केला. शिवाय सकल मराठा समाजाचा अपमान होईल, असे शब्द त्यांनी वापरले आहेत. जातीपातींमध्ये तेढ निर्माण होईल, दंगली भडकतील तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे शब्दोच्चार करून भावना भडकवण्याचे काम अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे, असेही निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भा.द.वि कलम १५३ (अ), ५००, ५०४, ५०५ (२) आणि २९५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.