सातारा - समाजातील अनेक लोक मानसिक तणावातून जात आहोत. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणं, हे सुद्धा ताणाचे कारण असू शकते. कोरोनाबद्दल खूप उलटी सुलटी माहिती समाज माध्यमाच्या मधून पसरते आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू, असे विचारही त्रास देवू शकतात. अशा परिस्थितीत भावनिक अस्वस्थता वाटत असलेल्या लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावे यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने चालणाऱ्या १०७७ या टोल फ्री हेल्प लाईन वर मानसिक आधार आणि समुपदेशनाचीदेखील सुविधा आता उपलब्ध आहे.
लढा कोरोनाशी : सातारा जिल्ह्याच्या १०७७ हेल्पलाईनवर मिळणार मानसिक आधार
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सगळा समाज धास्तावलेला आहे. सातारा जिल्ह्यातील लोकांना मानसिक आधार आणि समुपदेशन देण्याची यंत्रणादेखील सातारा जिल्हा प्रशासनाने चालू केली आहे. त्यासाठी १०७७ या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधायचा आहे.
शासनाचे अधिकारी, परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्प लाईनच्या वीसपेक्षा अधिक तज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी ह्यांच्या माध्यमातून हि सुविधा चालवली जाणार आहे. मनोविकार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, समुपदेशक रुपाली भोसले, योगिनी मगर आणि राणी बाबर ह्याचे समन्वयाचे काम पाहणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा, वाटत असेल अशा लोकांना समजून भावनिक आधार आणि समुपदेशन मनोबल हेल्पलाईनच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ज्यांना मन मोकळं करण्याची, आधाराची गरज वाटली तर 1077 नंबर वर फोन करावा, असे आवाहन यानिमित्ताने उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले आहे.
मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील. स्थलांतरित कामगार आणि हातवार पोट असलेल्या लोकांना अडचणी सोडवण्याचा आणि त्यांना आधार देण्याचे काम देखील यामार्फत केले जाणार आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा या विषयीचे ‘चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकूया’ हे ऑनलाईन प्रशिक्षण देखील या निमित्ताने घेतले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेले लोक स्वत:च्या आणि मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्या कोरोना संबधित चिंता भीती अधिक प्रभावी पणे हाताळू शकतात. ज्यांना हे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी १०७७ क्रमांकावर नाव नोंदणी करावी, हे प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे.