सातारा - सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. कोरेगाव तालुक्यात काही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने राष्ट्रवादीची सत्ता खेचत भगवा फडकवला. तर सातारा तालुक्यात भाजपच्या दोन्ही राजेगटात रस्सीखेच पहायला मिळत आहे.
654 ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार-
जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सातारा तालुक्यावर राजे गटांचाच दबदबा-
आज सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. फलटण तालुक्यात भाजपच्या दिग्गजांनी लक्ष घालूनही राजे गटाने ही निवडणूक एकतर्फी ठरविली. कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे गटाला शिवसेना व काही ठिकाणी भाजपने जोरदार झटका दिला. कराड तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सातारा तालुक्यात भाजपचे खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांचाच दबदबा पहायला मिळत आहे.
कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाणांना तर उत्तरेत सहकार मंत्र्यांना धक्का-
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. कराडमधूनही निकालाबाबतचे मोठं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपने धक्का दिला आहे. तसेच कराड उत्तर मधील काही ग्रामपंचायतीच्या निकालात राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील धक्का बसला आहे. शेणोली, शेरे गावात भाजपच्या डॉ. अतुल भोसले गटाने विजय मिळवला आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि नामदार बाळासाहेब पाटील यांना अतुल भोसले गटाने मोठा धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
देवराज पाटलांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग-
विधानसभेच्या कराड उत्तर मतदार संघातील खंडोबाचे देवस्थान असलेल्या पाल गावात भाजप समर्थक पॅनेलने सत्तांतर घडवले आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक आणि कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांच्या सत्तेला भाजपच्या गटाने सुरुंग लावला आहे. 25 वर्षानंतर या ठिकाणी सत्तांतर घडविण्यात विरोधकांना यश आले आहे.
खटाव मध्ये 'महाविकास'ची आघाडी-
खटाव तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ९० पैकी १४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक झालेल्या ७६ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालात महाविकास आघाडी, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. लक्षवेधी तिरंगी लढत झालेल्या निसोडमध्ये कॉंग्रेसच्या रणजीत देशमुख यांच्या पॅनेलने सत्ता अबाधित ठेवली आहे.