कराड (सातारा) - देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या खाशाबा जाधव यांना केंद्र सरकारने आजपर्यंत उपेक्षित ठेवले आहे. खाशाबा जाधव यांना न्याय मिळावा, यासाठी दिवंगत खाशाबा जाधव यांचे सुपूत्र रणजित जाधव यांनी देशातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून खाशाबांच्या योगदानाची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. म्हणून कुस्तीगीरांनी सोमवारी कराडमधील ऑलिम्पिक सर्कलसमोर लाक्षणिक उपोषण केले.
काय म्हणाले दिवंगत खाशाबा जाधव यांचे पुत्र कुस्तीगीरांचा सवाल?
देशाला कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी खाशाबांचे सुपूत्र आणि कुस्तीगीरांनी कराडमधील ऑलिम्पिक सर्कलसमोर लाक्षणिक उपोषण केले. आर्मी क्रीडांगणाला नीरज चोप्राचे नाव दिले, मग खाशाबा जाधवांवर अन्याय का, असा सवालही कुस्तीगीरांनी केला आहे.
हेही वाचा -कुस्तीचा जादूगार : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित
आणखी काय मागण्या?
- दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा
- खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलास शासकीय निधी लवकर मिळावा
- खाशाबा जाधव यांच्या नावाचा वापर करून आणि पैसे घेऊन पुरस्कार देणार्यांवर कारवाई व्हावी
- कुस्ती संकुलासाठी नेमण्यात आलेले सरकारी वकील बदलून कार्यक्षम वकील नेमावेत
- वाढीव डीएसआरप्रमाणे मंजूर निधी त्वरित हस्तांतरित करावा
- 2018 पासून बंद असणारी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा पूर्ववत सुरू करावी
- महाराष्ट्रातील कुस्ती मैदाने पुन्हा सुरू करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
1952 साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावले होते. प्रतिकूल परिस्थितीत मिळवूनही केंद्र सरकारकडून आजपर्यंत खाशाबांच्या योगदानाची दखल घेतली गेलेली नाही. मरणोत्तर पद्म पुरस्काराने खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीचा गौरव व्हावा, अशी देशभरातील तमाम कुस्तीगीरांची मागणी आहे. यासाठी त्यांचे सुपूत्र रणजित जाधव गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना भेटत आहेत. केंद्र सरकारने खाशाबा जाधव यांच्यावरील अन्याय दूर करून त्यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरव करावा. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवू, असा इशारा कुस्तीगीरांनी दिला आहे.