सातारा: विरोधी पक्षनेते अजित पवार दोन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आमदार शशिकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या कोरेगावमधील जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर चौफेर टोलेबाजी केली. काही झाले की मुख्यमंत्री गावी येऊन राहतात. शेती करायला आलो म्हणतात, पण नुसती स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? असा खोचक सवाल अजितदादांनी केला.
सरकार जमिनीवर नाही:अजित पवार म्हणाले की, आताच्या सरकारचे पाय जमिनीवर नाहीत. सर्व घटकांना सोबत घ्यायचे असते. परंतु, हे सूत्र सरकार विसरले आहे. मुख्यमंत्री नुसत्या चिठ्ठ्या वाचून दाखवतात. मला कुणाची चिठ्ठी देण्याची हिम्मत आहे का? त्यांनी एखादी नोट घ्यावी आणि पॉईंटने बोलावे. दुसऱ्याने दिलेली स्क्रिप्ट वाचणे हा मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान आहे.
मंत्रालयात तीन हजार फाईल्स पेंडींग:साताऱ्यातून तीन दिवसांत ६५ फाईल्स क्लिअर केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. आम्ही तर दाेन तीन तासांत तेवढ्या फाईल काढताे, असा टोला मारून अजित पवार म्हणाले, मंत्रालयात ३ हजार फाईल्स पडून आहेत. मात्र वर्षभरात आढावा बैठक कधीही घेतली नाही. मी कधीही खोटा आरोप करत नाही. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून सरकराने बदल्यांसाठी रेट ठरविल्याचा गंभीर आराेपही त्यांनी केला.
सरकारला सत्तेचा माज : शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे. केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचे चालले आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते. सत्ता असताना आम्ही सत्तेची मस्ती येवू दिली नाही. सरकारला एक वर्ष पुर्ण झाले. सरकारने आतापर्यंत काय केले? अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही. मग सरकार झोपा काढतंय का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
अर्थिक अहवालात पिछेहाट:आताच्या सरकारमधील मंत्री कुणाला विचारत नाहीत. मंत्रालयात बसायला ते तयार नाहीत, असे सांगून आर्थिक पाहणी अहवालमध्ये सरकारची पिछेहाट का होत आहे, याचे उत्तर सरकारने देण्याची मागणी अजितदादांनी केली. जाहीरातबाजीवर आम्ही कधी खर्च केला नाही. जनतेच्या पैशातून प्रसिद्धी चालली आहे. मीही चारवेळा अर्थमंत्री होतो, पण गरजेपुरताच जाहीरातीवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.