सातारा - यंदाच्या मान्सूनने काही काळ दडी मारल्यामुळे बळीराजा खुप चिंतेत होता. परंतु; बऱयाच प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आणि बळीराजा सुखावला असल्याचे चित्र सातारा परिसरात पाहायला मिळाले. आता मात्र शेतकऱयांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
माण, खटाव, कोरेगाव, पाटन आणि फलटण या तालुक्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला असल्याने या भागातील शेतकरी खरीप पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
'सर्ज्या राजा' म्हणत बळीराजाने केली पेरणीला सुरूवात... कोरेगाव, रहिमतपूर या परिसरातील शेतीमध्ये खरीप हंगामात घेवडा, वाटाणा, सोयाबीन आदी प्रमुख पिकांशिवाय माळरानाच्या जमिनीत तूर, मूग, मटकी, चवळी आणि बाजरी इत्यादी कडधान्याची पिके घेतली जातात. तर मोळ, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी, ललगुण, नागनाथवाडी, शिंदेवाडी या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वाटाण्याचे उत्पन्न घेतात.
उत्तर खटाव विभागातील डिस्कळ, ललगुण, बुध परिसरात खरीपाच्या पेरणीला आवश्यक असलेला पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. जिल्ह्यात सध्या खरीपाच्या पेरणीबरोबरच वाई, भुईंज, अनेवाडी परिसरात अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. डिस्कळ, गारवडी, मोळ, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी परिसरात खरीपाच्या पेरणीस वेग आला आहे.
काही ठिकाणी पेरणी पुर्ण झाली असून तीथे अजून पावसाची आवश्यकता आहे. मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये 'खंडीत' प्रकारचा पाऊस पडत असल्याने शेती उत्पन्नाला चांगलाच फटका बसला आहे. यंदाही तशीच परिस्थीती राहीली तर, पिके वाया जाऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.