महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज मिळण्यास सुरूवात - ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे माण तालुक्यातील १२ गावांमधील १८०० शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज मिळू लागली आहे. माण तालुक्यातील म्हसवड येथे उभारलेल्या सौर प्रकल्पातून कृषीपंपांना वीजपुरवठा सुरू झाला आहे.

Daytime electricity to agricultural pumps in Maan taluka
माण तालुक्यातील कृषी पंपांना दिवसा वीज

By

Published : Oct 6, 2020, 11:49 AM IST

सातारा (कराड) -रात्री-अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे माण तालुक्यातील १२ गावांमधील १८०० शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज मिळू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हा वीजपुरवठा तालुक्यातील म्हसवड येथे उभारलेल्या सौर प्रकल्पातून सुरू झाला आहे.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील ५० कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये वडूज विभागाअंतर्गत येणार्‍या म्हसवड उपकेंद्रातील देवापूर, धुळदेव आणि खडकी-भाटकी या तीन वाहिन्यांचा समावेश आहे. हा सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता ६.५ मेगावॅट इतकी आहे.

माण तालुक्यात सद्यस्थितीत शेतीला दिवसा ८ तास आणि रात्री १० तास, असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' ही योजना सुरू केल्याचा फायदा माण तालुक्यातील १२ गावांतील १८०० शेतकर्‍यांना झाला आहे.

हा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, साताऱ्याचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, महावितरण व महापारेषणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांंनी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details