सातारा - जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
दुष्काळी तालुके म्हणून राज्यात ओळख असलेल्या या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, अशी येथील परिस्थिती आहे. या परिस्थितीतही येथील काही शेतकरी द्राक्ष व डाळींबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करीत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी शेतकरी पाणी विकत घेवून या बागांचे संगोपन करीत आहेत. यंदा तर दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसला. त्यामुळे या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून टँकरने पाणी विकत आणून त्यांचे संगोपन केले आहे.