सातारा : मध्यप्रदेशमध्ये 31 जानेवारीपासून सुरू होणार्या खेलो इंडिया स्पर्धेत कराड तालुक्यातील किरपे या खेडेगावातील शेतकर्याची मुलगी प्राची अंकुश देवकर ही सातार्याचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. प्राचीने गुवाहाटीत झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक पटकावले आहे. आता तिला खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक आणायचे आहे. त्यासाठी ती दिवस-रात्र सराव करत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
प्राचीच्या यशाचा प्रवास कौतुकास्पद :गुणवत्तेला कसलाही आधार लागत नाही. किंबहुना गुणवत्ता ही कधीच गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाही. हिरा जसा चमकायचा राहत नाही, तशीच गुणवत्ता ही कधी ना कधी समोर येते. त्याचाच प्रत्यय प्राची देवकर हीच्या निवडीने आला आहे. शेतकर्याची मुलगी असलेल्या प्राचीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. आई-वडीलांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तिने आतापर्यंत 70 हून अधिक ट्रॉफी तसेच मेडल्स मिळवली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीमुळे तिच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ लागली आहे. लेकीच्या या कौतुकाने तिच्या आई-वडीलांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.
गुवाहाटीतील स्पर्धेत सुवर्ण पदक : आसाममधील गुवाहाटीत दि. 8 जानेवारी रोजी झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत प्राचीने 4 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदाकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी ती विमानाने एकटीच गुवाहाटीला गेली होती. तिचे वडील शेतकरी आणि आई घरकाम करते. अशा परिस्थितीतही आई-वडीलांनी तिच्या स्पर्धेसाठी पैसे गोळा केले. तिच्या समवेत विमानाने जाणे आई-वडीलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे प्राची एकटीच स्पर्धेला गेली होती. प्राचीने सुवर्ण पदक पटकावल्याचे कळताच आई-वडीलांच्या आंनदाला पारावार उरला नाही. लेकीचा सत्कार आणि कौतुक सोहळा पाहून मुलीने कष्टाचे चीज केल्याची भावना आई-वडीलांनी व्यक्त केली.