सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिंगणापूर यात्रेतील पारंपरिक मुंगीघाट कावडी सोहळा प्रशासनाने रद्द केल्याने सुमारे ७०० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वादशीला 'हरहर महादेव', 'म्हाद्या धाव' अशा जयघोषात दुमदुमून जाणारा मुंगीघाट डोंगर परिसर यावर्षी मात्र निर्मनुष्य दिसून येत आहे.
कोरोनामुळे शिखर शिंगणापूरची प्रसिद्ध सातशे वर्षांची कावड परंपरा खंडित शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी हजारो कावडी शंभू महादेवाला जलाभिषेक करतात. अवघड मुंगीघाटातून मानाच्या कावडी चढविण्याचा रोमहर्षक सोहळा शिंगणापूर यात्रेचे खास आकर्षण आहे. पुरंदर पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, कुंभारवळण आदी कावडी सुमारे सातशे वर्षापासून मुंगीघाट मार्गाने येऊन शंभू महादेवाला जलाभिषेक करतात.
चैत्र द्वादशीला सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगीघाटातून चढल्यानंतर शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता होत असते. यावर्षी मात्र, शिंगणापूर यात्रेवर कोरोनाचे जैविक संकट निर्माण झाल्याने प्रशासनाने यात्रा उत्सवावर कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे 13 व्या शतकातील मुघल राजवटीपासून सुरू असलेला पारंपरिक मुंगीघाट कावडी सोहळाही यावर्षी रद्द करण्यात आला आहे.
दरवर्षी चैत्र द्वादशीच्या दिवशी देवाच्या लग्नाची वरात म्हणून मुंगीघाटातून पुणे, सोलापूर जिल्ह्यातील सासवड, खळद, एखतपूर, बेलसर, कुंभारवळण, शिवरी, खानवडी, धायरी, फुरसुंगी यासह इंदापूर, बारामती, माळशिरस, सांगोला तालुक्यातील कावडी मुंगीघाटातून चढविण्यात येतात. शिवभक्त 'हरहर मदादेव' गर्जनेत मानवी साखळी करून, भक्तीशक्तीचे विराट दर्शन घडवून मोठ्या साहसाने अवजड कावडी मुंगीघाटातून घाटमाथ्यावर आणतात. सर्वात शेवटी मानाच्या कावडी मुंगीघाटातून वर आल्यानंतर सर्वात शेवटी सासवड येथील कैलास काशीनाथ कावडे (संत भुतोजीबुवा तेली) यांची मानाची कावड चढविण्यात येते. कावडीधारक भाविकांनी 'हरहर महादेव' जयघोष करत, गुलालाची उधळण करत, टाळ्यांचा गजर करत तसेच फटाक्यांची आतषबाजी करत कावडी चढविल्याचा आनंद व्यक्त करतात.
मात्र, कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी सुमारे सातशे ते हजार वर्षांची परंपरा असलेला मुंगीघाट कावडी सोहळा खंडित झाला आहे. 'हरहर महादेव', 'म्हाद्या धाव' जयघोष, ढोल ताशांचा आवाज, भाविकांचा जल्लोषाने दुमदुमून जाणारा मुंगीघाट परिसर यावर्षी शांत व स्तब्ध दिसून येत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असलेला मुंगीघाट डोंगर परिसर यावर्षी मात्र, निर्मनुष्य व ओसाड दिसत आहे. शेकडो वर्षांच्या कावडी सोहळ्याच्या परंपरेला छेद गेल्याने भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.
मांढरदेव दुर्घटनेनंतर परवानगी, मात्र कोरोनामुळे निर्बंध -
सन 2005 मध्ये झालेल्या मांढरदेव दुर्घटनेनंतर माजी न्यायाधीश कोचर आयोगाच्या अहवालानुसार भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंगीघाटातून कावडी लढविण्यास प्रशासनाने प्रतिबंध केला होता. मात्र, शेकडो वर्षांच्या परंपरेचा दाखला देत कावडीधारकांनी त्यावेळी मंत्रालयातून विशेष परवानगी आणून मुंगीघाट कावडी सोहळ्याची परंपरा अबाधित ठेवली होती. यावर्षी मात्र कोरोनाचे जैविक संकट असल्याने प्रशासन यंत्रणेने गर्दी होणारे सर्वच धार्मिक सोहळे स्थगित केले आहेत. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेला मुंगीघाट कावडी सोहळाही खंडित झाला आहे.