कराड (सातारा) -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील संवर्धन वनक्षेत्रात वाघाच्या अस्तित्वाचा सचित्र पुरावा मिळाला आहे. संवर्धन वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री शिकार केलेल्या प्राण्यासह नर वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.
सह्याद्रीच्या संवर्धन वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्व, कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळाला पुरावा - Existence of tigers in Sahyadri Conservation Forest
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील संवर्धन वनक्षेत्रात वाघाच्या अस्तित्वाचा सचित्र पुरावा मिळाला आहे.
यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी राज्य सरकारने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील आठ वनक्षेत्रांना संरक्षित क्षेत्र घोषित केले होते. त्यामध्ये सातार्यातील जोरजांभळी, कोल्हापूरमधील विशाळगड, पन्हाळा, गगनबावडा, आजरा-भुदरगड, चंदगड, सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग आणि तिलारी वनक्षेत्रांचा समावेश होता. या वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव आणि खास करून वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्या संदर्भातील पुरावा आता हाती लागला आहे. वन विभागाने संरक्षित केलेल्या आठपैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे. वाघाच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचार्यांनी संवर्धन क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यामध्ये बुधवाटी रात्री नर वाघाचे छायाचित्र टिपले गेले असल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी दिली आहे. वाघाचे छायाचित्र टिपले गेलेल्या नेमक्या जागेबद्दल सांगणे अशक्य आहे. शिकार केलेल्या प्राण्याबरोबर वाघाचे छायाचित्र टिपले गेल्याचेही त्यांनी सांगितले.