सातारा - कराड, सांगली आणि कोल्हापूर या शहराला महापुराचा धोका आहे. तो धोका रोखण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर अनेक लघु पाटबंधारे तलावाची कामे अपूर्ण आहेत.ती पूर्ण केली तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील येणारी पूरपरिस्थिती आटोक्यात आणता येईल. त्यामुळे ती अपूर्ण कामे पूर्ण व्हावी अशी मागणी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील आले असता त्यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी या मागणीचे निवेदन पाटील यांना दिले. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर उपस्थित होते.
कोयना परिसर त्याचप्रमाणे उरमोडी, तारळी, उत्तरमांड, निवकणे, बिबी, वांग-मराठवाडी, चांदोली, काळम्मवाडी धरणाची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. तसेच सांगली-कोल्हापूर-सातारा क्षेत्रातील लघु पाटबंधारे तलाव, डोंगर माथ्यावरील पाझर तलाव हजारो शेतकऱ्यांच्या शेतात झाल्यास कमीत कमी अंदाजे 20 ते 25 टीएमसी पाण्याची साठवणूक होऊ शकते. याचा फायदा पावसाच्या दिवसात धरणे पूर्ण भरल्यानंतर येणारी पूरपरिस्थिती बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल.