महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले युरेशियन ग्रिफॉन गिधाड - Eurasian Griffon Vulture Sahyadri Information

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जयगड भागात गस्त घालत असताना घिरट्या घालणार्‍या युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला वनक्षेत्रपाल स्नेहल मगर आणि वनरक्षक संतोष चाळके यांनी कॅमेराबद्ध केले. हा ग्रिफॉन गिधाड केरळमधील वायनाड अभयारण्यातून सोडण्यात आला होता, अशी माहिती पुढे आली आहे.

Griffon vulture Jaygad area
युरेशियन ग्रिफॉन गिधाड आढळले

By

Published : May 29, 2021, 6:43 PM IST

कराड (सातारा) -सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जयगड भागात गस्त घालत असताना घिरट्या घालणार्‍या युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला वनक्षेत्रपाल स्नेहल मगर आणि वनरक्षक संतोष चाळके यांनी कॅमेराबद्ध केले. हा ग्रिफॉन गिधाड केरळमधील वायनाड अभयारण्यातून सोडण्यात आला होता, अशी माहिती पुढे आली आहे.

माहिती देताना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे

हेही वाचा -स्वागतासाठी बुके घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी खडसावले

स्थालांतराचा आभ्यास करण्यासाठी टॅग लावण्यात आले

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आढळलेला युरेशियन ग्रिफॉन गिधाड पक्षी हा केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात चक्करक्कल येथे 28 डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत एका घराच्या आवारात वनविभागास सापडला होता. त्यानंतर ममलबार जागरुकता आणि वन्यजीव बचाव केंद्रात त्याला उपचारासाठी ठेवण्यात आले होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक तथा प्रधान शास्त्रज्ञ विभू प्रकाश यांच्या सल्यानुसार केरळ वनविभाग आणि केरळ येथील पक्षी तज्ज्ञ आर. रोश्नाथ, सी. सशीकुमार यांनी गिधाडाच्या पंखाला नारंगी टॅग आणि पायाला रिंग लावून 31 जानेवारी रोजी वायनाड वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त केले होते. गिधाडाच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी नारंगी टॅग व त्यावर इंग्रजी अक्षर एल-8 असा सांकेतांक लावण्यात आला होता. हा टॅग व रिंग केरळमध्ये लावल्याची माहिती मिळाली आहे. हा पक्षी काही दिवस त्या परिसरात घिरट्या घालत होता. त्यानंतर केरळ-वायनाड येथून तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे एका पक्षी निरीक्षकाला तो दिसला होता. त्यानंतर वायनाडच्या जंगलात मृत चितळाचे मांस खाताना 28 फेब्रुवारीला वनाधिकारी व पक्षी अभ्यासक रोश्नाथ रमेश यांनी त्याला कॅमेराबद्ध केले होते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ग्रिफॉनगिधाडाची पहिल्यांदाच नोंद

वायनाड येथील जंगलातून उडाल्यानंतर आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तो आढळून आला आहे. या पक्ष्याने केरळपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत प्रवास केल्याचे निरीक्षणही अभ्यासकांकडून नोंदविण्यात आले आहे. केरळ वायनाड ते जंगली जयगड (कोयना अभयारण्य) हे अंतर जवळपास 900 किलोमीटर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये युरेशियन ग्रिफॉन गिधाडाची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. युरेशियन गिधाड हे दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियामध्ये प्रजनन करतात. भारतामध्ये बहुधा हे पक्षी उत्तर हिमालयीन प्रदेशामधून स्थलांतर करून येतात.

जयगड भागामध्ये आढळले गिधाड

महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली तरी पांढर्‍या पुठ्ठ्याची, लांब चोचीची पांढरी गिधाडे 1990 आणि त्यापूर्वी मोठ्या संख्येने आढळत होती. अपुर्‍या खाद्य पुरवठ्यामुळे देशात आणि राज्यात आढळणारी गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे, त्यांचा समावेश नष्टप्राय श्रेणीतील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. वनक्षेत्रपाल स्न्हेल मगर व वनरक्षक संतोष चाळके हे जयगड भागामध्ये गस्तीवर असताना त्यांना हे गिधाड घिरट्या घालताना दिसले. त्यांनी या गिधाडाची छायाचित्रे टिपली. त्यानंतर हे गिधाड दिसते का म्हणून जवळपास 10 दिवस सह्याद्री व्याघ्र प्रकल्याच्या पश्चिमेकडील भागात शोध घेण्यात आला. तसेच, गिधाडाची छायाचित्रे अभ्यासाठी सातार्‍याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना देण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात युरेशियन गिधाडाची ही पहिलीच नोंद असल्याची माहिती रोहन भाटे यांनी दिली.

गिधाड दिसल्यास संपर्क करावा - रोहन भाटे

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ग्रिफॉन गिधाड आढळल्याने त्याच्या निरीक्षणासाठी एक प्रोटोकॉल तयार करणे आवश्यक आहे. गिधाड हे 300 ते 400 कि.मी. अंतर सहज घिरट्या घालत पार करतात. त्यामुळे कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि पुण्याकडील पश्चिम भागात पक्षी निरीक्षण करणार्‍यांनी ग्रिफॉन गिधाड दिसल्यास छायाचित्र काढून संपर्क साधावा, जेणेकरून गिधाडाचा पुढील प्रवासाचा उलगडा होईल व नोंदी ठेवण्यास मदत होईल, असे आवाहन सातार्‍याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केले.

हेही वाचा -'प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करा'

ABOUT THE AUTHOR

...view details