सातारा - 'जेवढी सेवा तेवढीच फी' असा नारा देत खासगी शाळांच्या मनमानी विरुद्ध लढा देण्यासाठी साताऱ्यातील पालकवर्ग एकवटला आहे. या लढ्यासाठी सातारा जिल्हा शिक्षक-पालक संघाची घोषणा एका बैठकीत करण्यात आली.
खिसेभरु वृत्तीला चाकोरीत आणण्यासाठी एकजूट
या संघाची गरज स्पष्ट करताना प्रशांत मोदी म्हणाले, पालकांना फी भरण्यास कोणतीही अडचण नसून शाळांनी या शैक्षणिक वर्षात जी सेवा दिली त्याचे मूल्य घ्यावे, अशी आमची व्यवहारिक मागणी आहे. शाळा स्वतःचा एक रुपया सुद्धा नफा सोडायला तयार नाहीत. याबद्दल पालक वर्गात मोठी नाराजी आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली चाललेल्या खिसेभरू शिक्षण संस्थांना चाकोरीत आणण्यासाठी जिल्हा पालक संघ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या संघाची पुढील रूपरेषा ठरवली जाईल.
काय आहे पालकांचे म्हणणे
शिक्षकांचा पगार, बिल्डिंग मेंटेनन्स, लाईट बिले, अशा विविध ढाली पुढे करून पालकांना पूर्ण फी भरण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणत आहेत. मुलांना ऑनलाइन क्लासच्या ग्रुप मधूनबाहेर काढणे, मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती घालणे, ग्रुपवर फी भरून न शकलेल्या पालकांची नावे जाहीर करून त्यांना लज्जित करणे असे प्रकार खासगी शाळा करत आहेत. यामध्ये शाळेत असणारा पालक-शिक्षक संघाच्या वापर शाळा स्वतःच्या फायद्यासाठी करत असून त्यांच्याद्वारे पालकांना विविध सवलत देत फी भरण्यासाठी दबाव आणत आहेत. याला पालक-शिक्षक संघाच्या एखाद्या मेंबर्सनी विरोध केल्यास त्यांना धमकावण्याचा प्रकार होत आहे, अशा तक्रारी काही पालकांनी मांडल्या.
लोकशाही मार्गाने करणार विरोध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी शिक्षण संस्थांनी पालकांना फीमध्ये कोणत्याही स्वरुपाची सवलत न देता पूर्ण फी भरण्याचा तगादा लावला आहे. शाळेतील शिक्षकांना वसुली कामी जुंपण्यात आले. कोरोनामुळे सर्वांचेच आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. लोक अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत, ही सहज समजणारी गोष्ट लक्षात न घेता खासगी शाळा कार्पोरेट पद्धतीने वागत असल्याचा आरोप उपस्थित पालकांनी केला. साताऱ्यातील खासगी शाळांच्या हिटलरशाहीला लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला. शिक्षकांना पूर्ण पगार मिळावा ही पण आमची मागणी असणार असल्याचे प्रशांत मोदी यांनी सांगितले. ज्यांनी यापूर्वी फी भरली आहे त्यांनाही पुढील वर्षात फरकाची रक्कम वजा करून द्यावी, अशी मागणी संघाच्यावतीने करण्यात आली.
हेही वाचा -विद्यार्थ्याने बनविलेला 'बॅटरीवरचा रोबोट' पोहोचविणार कोरोनाग्रस्तांना औषधे