सातारा -यंदा कोरोनामुळे आतापर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आज सरकारच्या परवानगीनंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातल्या शाळा आज सुरू झाल्या, दीर्घ कालावधीनंतर आज शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ५० टक्के हजेरी व ५० टक्के ऑनलाईन या तत्वावर इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
पालकांचे संमतीपत्र
कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता, तेव्हापासून आजपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सोमवारी सरकारच्या परवानगीनंतर राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेकडून खबरदारी
आज सातारा जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत, शाळा प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच सर्व वर्गांची स्वच्छता देखील करण्यात आली आहे. विद्यार्थांची गर्दी टाळण्यासाठी शिक्षकांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मास्क घातल्याशिवाय विद्यार्थांना वर्गात प्रवेश दिला जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात शाळेला सुरुवात विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याचा आनंद
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा ढाणे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाली की, लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र प्रत्यक्षात शिक्षकांकडून ज्ञानार्जन करण्याचा आनंद वेगळाच असतो. आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आनंद होत आहे. दरम्यान शाळा प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली आहे, मात्र तरीदेखील मुलांना शाळेत पाठवताना भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.