महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणतंत्रदिनाच्या दुसऱ्याच दिवशी ३०० कामगारांवर उपासमारीची वेळ.. 'निटको' कंपनीला टाळे

आज नेहमीप्रमाणे कंपनीत येताच कामगारांना लॉक आऊटची नोटीस दिसली. हा सर्वच प्रकार कामगारांना अचंबित करणारा होता. विशेष बाब म्हणजे जे ५ कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते, त्यांना सुद्धा याची साधी कल्पनाही नव्हती. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या गेटला लॉक लावले आहे.

nitko
'निटको' कंपनीबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शने

By

Published : Jan 27, 2020, 5:20 PM IST

Updated : Jan 27, 2020, 5:41 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्यातील श्रीगावमध्ये असलेल्या 'निटको' टाईल्स कंपनीच्या कामगारांवर रातोरात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी गेटवर नोटीस लावून टाळे ठोकले. याविरोधात आज कंपनीच्या गेटबाहेर कामगारांनी धरणे आंदोलन केले.

कंपनी प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे स्थानिकांसह राज्यातील आणि परराज्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. श्रीगाव गावात निटको कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी १९९५ साली ५० स्थानिकांची ८६ एकर जागा खरेदी केली होती. या जागेवर १९९७ साली निटको कंपनीची बांधणी केली. या कंपनीत घरासाठी लागणाऱ्या टाईल्सची निर्मिती केली जात होती. कंपनी स्थापन झाल्यानंतर स्थानिकांनाही रोजगार मिळाला. या कंपनीत २५० कंपनी कामगार तर ५० कंत्राटी कामगार काम करू लागले.

हेही वाचा - 'तसं' झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याच्या आम्हाला सुचना, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

आज २७ जानेवारीला कामगार नेहमीप्रमाणे कंपनीत येताच त्यांना लॉक आऊटची नोटीस दिसली. हा सर्वच प्रकार कामगारांना अचंबित करणारा होता. विशेष बाब म्हणजे जे ५ कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते, त्यांना सुद्धा याची साधी कल्पनाही नव्हती. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या गेटला लॉक लावले आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असुन हा लढा कायदेशीर लढणार असल्याचे कामगारांनी सांगितले.

हेही वाचा - शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

कंपनी बंद करण्याआधी कामगारांकडून टाईल्सची निर्मिती करून घेण्यात आली आहे. ४ महिन्यापासून कंपनीमध्ये साफसफाईची कामे कामगारांकडून करून घेतली जात होती. याशिवाय कामगारांचे ४ महिन्यांचे वेतनदेखील थकीत होते. याविरोधात आवाज उठवल्यानंतर कामगारांना १ महिन्याचा पगार देण्यात आला होता. उर्वरित पगार अजुनही थकीत आहे. हे पैसे त्वरित देण्यात यावे, अशी मागणी आता कामगार करत आहेत. राज्याच्या कामगार मंत्र्यांनी आमच्या या बेरोजगारीवर तोडगा काढावा, अशी आर्त विनवणी कामगार करीत आहे.

हेही वाचा - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर कोल्हापूरच्या गिर्यारोहकाने फडकवला ७१ फुटांचा तिरंगा

अलिबागमधील कंपनीला टाळे ठोकून कंपनीने येथील कामगारांना वाऱ्यावर सोडले असताना गुजरातमधील युनिट मात्र सुरू ठेवले आहे. कंपनी फायद्यात असताना कंपनी प्रशासनाने कंपनी बंद करण्याचा घाट घातल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत कंपनीचे अधिकारी अजोय कुरूप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Last Updated : Jan 27, 2020, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details