कराड (सातारा)- सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे. त्या संस्था वगळून अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. तथापि, कोरोनाचे वाढते संक्रमण आणि अंशत: लॉकडाऊनमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.6 एप्रिलपर्यंत संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर होत्या. त्याच टप्प्यावरून निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू केली जाईल, असेही सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम 18 मार्च, 2020 ला सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर 17 जून, 28 सप्टेंबर, 31 डिसेंबर, 2020, 16 जानेवारी, 2021 आणि 24 जानेवारीलाही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. ही मुदत 31 मार्च, 2021 अखेर होती. मात्र, सद्य स्थितीत पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्या संस्थांना या आदेशातून वगळले आहे. ज्या संस्थांची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुका कोविड निर्बंधांचे पालन करून घेण्यात याव्यात, असेही सहकार विभागाने सूचित केले असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -सातारामध्ये कोरोना बाधितांचा आकडा आठ दिवसात दुप्पट