सातारा -खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभे आधी आपली उपस्थिती लावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली असून त्या अनुषंगाने त्यांना विचारले असता त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत सातारा जिल्हा बँकची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विश्रांतीनंतर प्रथमच बॅंकेत
खासदार उदयनराजे कोविडमधून नुकतेच बाहेर पडले आहेत. पुर्ण विश्रांती घेतल्यानंतर प्रथमच ते जिल्हा बॅंकेच्या भेटीच्या निमित्ताने माध्यमांसमोर आले. ते म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही. पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचा पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
'बँकेचे कामकाज व्यवस्थित'
बँक व्यवस्थित चालली असताना बँकेला ईडीची नोटीस का पाठविण्यात आली? असा सवाल खासदार उदयनराजेंनी उपस्थित केला. ईडीने या बँकेला नोटीस पाठवली, त्याचे पुढे काय झाले? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकचे कामकाज व्यवस्थित चालले आहे, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
'रामराजेंच्या मताला महत्व'
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होत आहे. ही बिनविरोध करण्याकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कल आणि प्रयत्न असणार आहे. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती आणि ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ज्येष्ठ संचालक आणि पवार कुटुंबांचे विश्वासू म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मताला महत्व असणार आहे. गेल्या काही वर्षांत रामराजे आणि उदयनराजे यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांच्या मागणीचे विविध अर्थ काढले जात आहे.
हेही वाचा -पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालतंय - चंद्रकांत पाटील