सातारा : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव च्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी 25 नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी सातारा जिल्हा दौर्यावर ( Eknath Shinde on Satara District ) येत आहेत. यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा :कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनासह नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि एका पुलाच्या कामाचे भूमीपूजनही मुख्यमंत्री करणार आहेत.
कृषी प्रदर्शन पोहोचले सातासमुद्रापार : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान प्रतिवर्षी यशवंत कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनाचे यंदा 17 वे वर्ष आहे. या प्रदर्शनात नामांकित कंपन्या आपले स्टॉल मांडतात. कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण-घेवाण होते. चार दिवसांच्या या प्रदर्शनाला आठ ते दहा लाख लोक भेट देतात. हायटेक पध्दतीने होणार्या या प्रदर्शनाचा लौकीक सातासमुद्रापार पोहोचला आहे. यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होते. प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले जाते. हे प्रदर्शन आता वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे.
दिवंगत विलास उंडाळकरांची संकल्पना : कराडचे सुपूत्र आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने शेतकर्यांसाठी उपक्रम कराडमध्ये राबविला पाहिजे, असा विचार मनात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलास उंडाळकर यांनी शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यशवंत कृषी, औद्योगिक प्रदर्शनाची संकल्पना मांडली. त्यानुसार बाजार समितीच्या फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या विस्तीर्ण जागेत कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कोरोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली 16 वर्षे प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, फळे, फुले, पशु-पक्ष्यांच्या स्पर्धा आणि जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनात कोट्यवधीची उलाढाल होताना पाहायला मिळते.