सातारा - पालक धाकट्या भावाचाच लाड करतात, या ईर्शेतून आठ वर्षीय लहान भावाची डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यात घडली आहे. खंडाळा तालुक्यातील नायगावमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास हत्येचा हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौशल्याने तपास करून तीन तासात अल्पवयीन आरोपीस नायगावातून ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या खंडाळा तालुक्यातील नायगावमध्ये बारा व आठ वर्षांच्या दोन मुलांसह एक शेतमजूर कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील धाकट्या मुलाच्या गळ्यावर तसेच डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या झाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आणि आरोपीचा शोध सुरू केला.
भावावर संशय-
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा व शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी सूक्ष्म निरीक्षण करून मृत मुलाची आई व त्याचा थोरला भाऊ तसेच परिसरातील रहिवाशांकडे प्राथमिक चौकशी केली. घटनेच्या दिवशी मृत मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ यांचे दुपारच्या वेळेला भांडण झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. पुढे मृताच्या मोठ्या भावाला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, तो काहीतरी माहिती लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता, त्याने धाकट्या भावाचा आपणच खून केल्याची कबुली दिली. किरकोळ भांडणातून रागाच्या भरात आरोपीने त्याच्या लहान भावाच्या डोक्यात आणि गळ्यावर कुर्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी झोपडी पेटवण्याचा प्रकार -
गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. छोट्या-छोट्या घरगुती गोष्टींमध्ये आई-वडील धाकट्या भावाचे ऐकतात, त्याचेच लाड पुरवतात अशी अल्पवयीन मुलाची धारणा झाली होती. काही दिवसांपूर्वी घरगुती रागातून अल्पवयीन आरोपी मुलाने रात्री झोपडी पेटवण्याचा प्रकार केला होता. ही बाब त्याच्या धाकट्या भावाला समजली होती. तो आपल्या पालकांना ही गोष्ट सांगेल या भीतीतून त्याने सख्ख्या धाकट्या भावाचा खून केल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेवेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक उमेश हजारे आदी यावेळी उपस्थित होते.