सातारा- 'खंडोबाच्या नावानं चांगभलं..', 'येळकोट.. येळकोट.. जय मल्हार!' आणि 'सदानंदाचा येळकोट!'च्या जयघोषाने पालनगरी बुधवारी दुमदुमून गेली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे आठ लाख भाविकांनी खोबरे अन् भंडार्याच्या केलेल्या उधळणीने खंडोबाची पाली पिवळ्या धम्मक भंडार्यात न्हाऊन निघाली. गोरज मुहूर्तावर मल्हारी आणि म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळाही भाविकांनी अनुभवला. या सोहळ्यासाठी आलेल्या गर्दीमुळे तारळी नदीचे वाळवंट फुलून गेले होते.
कराड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या ऐतिहासिक पालीच्या खंडोबा यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. जिल्हा प्रशासनाने यात्रेतील जुन्या प्रथांमध्ये बदल केल्यामुळे बरीच विघ्ने कमी झाली आहेत. मिरवणूक मार्गावरील ताणही कमी करण्यात प्रशासन यशस्वी झाले. त्यामुळे, दरवर्षी होणारे भाविकांचे हाल टळले. सुरक्षेच्या दृष्टीने वाढवलेल्या निर्बंधांमुळे भाविकांना दर्शन घेताना त्रास झाला. मात्र, एकंदरीतच प्रशासनाने नव्याने राबवलेला हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला.
भंडारा आणि खोबर्याची उधळण करण्यासाठी भाविक तारळी नदीपात्राच्या दक्षिणोत्तर परिसरात जमले होते. त्यामुळे नदीचे वाळवंट गर्दीने फुलून गेले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला भाविकांचा अथांग जनसागर यावेळी भंडार्यात न्हाऊन निघाला. खंडोबा-म्हाळसाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावांमधील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काठ्या, पालख्या आणि मार्तंड देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूक लक्षवेधी ठरली.