सातारा (कराड) - कोरोना संक्रमणाचा धोका वाढल्याने कराड आणि मलकापूर परिसरात मध्यरात्रीपासून पुढील आठ दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी सायंकाळी जारी केले. कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आठवर पोहचली आहे. तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराडमध्ये बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी कराड आणि मलकापूर परिसरात कर्फ्यू लागू केला.
कराड-मलकापूर उद्यापासून आठ दिवस 'लॉकडाऊन'; फक्त दवाखाने सुरू राहणार
कोरोना संक्रमणाचा धोका वाढल्याने कराड आणि मलकापूर परिसरात मध्यरात्रीपासून पुढील आठ दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी सायंकाळी जारी केले.
कर्फ्यू काळात दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता सर्व काही बंद राहील. औषधे घरपोहच दिली जाणार आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी यापूर्वी देण्यात आलेले पास आणि ओळखपत्रे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरविली आहेत. कराड नगरपालिका क्षेत्र, मलकापूर नगरपालिका आणि परिसरातील गावांमध्ये मध्यरात्रीपासून पुढील आठ दिवस कर्फ्यू लागू असणार आहे. या काळात पोलीस पेट्रोल पंप वगळता अन्य सर्व पेट्रोल पंपांवरील इंधन विक्री बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि रुग्णवाहिका यांनाच पेट्रोल- डिझेल देण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत. त्यांच्याशी सौजन्याने वागावे. त्यांना खरी माहिती द्यावी. खोटी माहिती दिल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.